ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेअरी आणि कृषी क्षेत्राला उज्वल भविष्य – डॉ. चेतन नरके

कोल्हापूर : व्यवस्थापन शास्त्रात अमुल्य क्रांती मो घडवणाऱ्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक अर्थशास्त्रात केला तर डेअरी आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवता येईल आणि शेतकऱ्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडेल असे प्रतिपादन डॉ चेतन नरके यांनी केले.

बँकॉक येथे आयोजित ब्लॉकचेन जागतिक परिषदेत ‘डेअरी, कृषी, आरोग्य सेवा आणि बँकिंग क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक टप्प्यातील माहिती क्रमवारीने संग्रहित केली जाते. या माहितीत बाहेरून फेरफार करणे शक्य नसल्याने हि माहिती अधिकृत आणि विश्वासार्ह असते. म्हणूनच हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार,फसवणूक, भेसळ, कच्च्या दुव्यांचा गैरफायदा अशा बाबींना आवर घालण्यासाठी आणि रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. पुरवठा साखळीत पारदर्शकता आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.बँकिंग क्षेत्रात कर्जदार आणि बँक यांच्या मध्ये असणाऱ्या प्रक्रिया साखळीत प्रत्येक टप्पा पारदर्शक बनल्यामुळे अगदी गावखेड्यातील एखाद्या व्यक्तीला बिनधोक पणे कर्ज देणे आणि ते वसूल होणे हे शक्य होणार आहे.

कृषी आणि डेअरी क्षेत्रात उत्पादक आणि ग्राहक यांना थेट जोडणारे हे तंत्रज्ञान आहे. ग्राहकाला मिळालेले दूध हे कोणत्या गायीचे आहे ? त्या गायीचा मालक कोण ? ती गाय कोणता चार खाते ? तिचे आरोग्य कसे आहे ? हे दूध कोणत्या गाडीतून कोणत्या तापमानात ग्राहका पर्यंत पोहोचले याची इत्यंभूत माहिती या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळू शकते. हेच कृषी मालाच्या बाबतीत असणार आहे त्यामुळे या पुरवठा साखळीतील प्रत्येक प्रक्रियेशी प्रत्येक घटक जोडला गेल्याने व्यवसायिक आणि मानवी संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. व्यवस्थापन आणि नियोजन काटेकोरपणे केल्यामुळे यामध्ये व्यवसायिकता येईल आणि त्रुटींचा अभ्यास करून आवश्यक बदल केल्याने नफ्यात वाढ होईल. सिंगापूर सारखे देश १००% ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच वापर करतात.उत्पादकाला अधिक दर देणे आणि ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन पुरवठा करणे यासाठी भारतात या तंत्रज्ञानाच्या वापराचा अधिक प्रसार करणार असल्याचे ते म्हणाले. जगभरातील प्रमुख देशांनी यात सहभाग घेतला होता. या परिषदेतील गोलमेज परिषदेत विकसीत देशातील प्रतिनिधींनी डॉ चेतन नरके यांच्याशी संवाद साधून या विषयावर चर्चा केली.

🤙 8080365706