
कसबा बावडा: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्यावतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी आणि पादुका परिक्रमेचे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील श्री गजानन महाराज मंदिरात आगमन झाले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबियांच्यावतीने पालखी आणि पादुकांचे स्वागत व पूजन करण्यात आले.

दर्शन व महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी झाली होती .अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व भक्तांना स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज आणि मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, विदर्भ आणि मराठवाडा याठिकाणी स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुका परिक्रमेच आयोजन केले जाते. ८ मे २०२३ पर्यत सुरू असणाऱ्या या परिक्रमेच कदमवाडी येथील डॉ. डी . वाय . पाटील हॉस्पिटल परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये आगमन झाले. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील व डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि हॉस्पिटल प्रशासनाने या पालखी आणि पादुकांचे उत्साहात स्वागत व पूजन केले. यावेळी मंदिर परिसरात फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या . पालखी आणि पादुका मंदिरामध्ये आल्यानंतर विधीवत पूजन करून धार्मिक विधी करण्यात आला . त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी आणि पादुका परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष जगन्नाथ भोसले, मुख्य पुजारी संजय लक्ष्मणराव कुलकर्णी यांच्यासह स्वामी समर्थांचे भक्त उपस्थित होते. कोल्हापुरातील भाविकांनी या पालखी आणि पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
