
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांबद्दल अवमानकारक विधाने केल्याप्रकरणी त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींचं टेन्शन वाढलं आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातून टीका होत आहे. तर यावर भाजपने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता संभाजीराजे छत्रपतींनी राज्यपालांना थेट पदावरून हटवण्याची मागणी केल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
संभाजीराजेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटंल, ”माननीय नरेंद्रभाई मोदी जी, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने महाराष्ट्र राज्य व महापुरुषांबाबत अपमानास्पद विधाने करीत आहेत. राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल, असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे.केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, महाराष्ट्रची परंपरा व मराठी अस्मिता या बाबतीत सातत्याने बेताल भाष्य करून ते केवळ राज्यातील जनतेच्या भावनांचा अपमान करीत नसून, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे राज्यपाल या पदाचे देखील अवमूल्यन होत आहे”, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती चांगलेच भडकले आहेत.दरम्यान, ”आपण देशाचे पंतप्रधान एकिकडे नौदलाचे जनक म्हणून महाराजांचा गौरव करता. तर दुसरीकडे राज्यपाल अवमानकारक बोलतात. त्यामुळे राज्यातील जनतेच्या भावनेचा विचार करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे”, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
