
कोल्हापूरःसामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणारा शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार कोल्हापर जिल्हा परिषदेला जाहीर झाला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्यात वनीकरण आणि संवर्धनाची चांगली मोहीम या माध्यमातून राबविण्यात आली असल्याचे चव्हाण सांगितले. वृक्ष संवर्धनास अधिक व्यापक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासन २००८ पासून हा पुरस्कार देत आहे. यावर्षीपासून पुरस्काराच्या रकमेत प्रशासनाने भरीव वाढ केली आहे. पुरस्काराच्या रकमेत वाढ केल्याने वृक्षरोपण व संवर्धन करणा-या व्यक्ती-संस्था यांना प्रोत्साहन मिळणार आहे. महसूल स्तरावर व्यक्ती, ग्राम पंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार ५० हजार रुपये, व्दितीय पुरस्कार ३० हजार रुपये. राज्यस्तरावर संवर्गनिहाय व्यक्ती, ग्राम पंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, व्दितीय पुरस्कार ७५ हजार व तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.
सर्व महसूल विभाग स्तरावरुन प्राप्त झालेल्या प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यांमधून (महसूल विभाग स्तरावरील ६० पुरस्कार प्राप्तकर्त्यांमधून) सदर १५ राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषदेची निवड प्रथम पुरस्कारासाठी झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेला ८४ गुण तर द्वितीय पुरस्कार प्राप्त सातारा पेालीस अधिक्षक कार्यालयाला ४४ गुण प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साई एज्यूकेशन सोसायटी गिजवणे ता. गडहिंग्लज या संस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि आधार फौंडेशन रूकडी ता. हातकणंगले या संस्थांनाही प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण लवकरच राज्यस्तरावर कार्यक्रमात होणार आहे.
