
मुंबई : हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी देखील चित्रपटावर आक्षेप घेतले आहेत.
यानंतर आता आव्हाडांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. आव्हाड म्हणालेत की, “हर हर महादेव या चित्रपटावर अखेरीस हा कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन चित्रपट नाही असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले.”पुढे त्यांनी म्हटले आहे की, “आता तरी त्याचे समर्थन करणा-यांचे डोळे उघडतील का? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, की हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का?” असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्राध्यापक रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे आक्षेप नोंदवले.
रुपाली देशपांडे म्हणाल्या, ‘सिनेमॅटिक लिबर्टी याचा अर्थ इतिहास बदलणे, असा नक्कीच होत नाही, तसेच ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे अनुचित आहे. दुर्दैवाने, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखवलेल्या आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही या चित्रपटातील कलाकार सुबोध भावे यांना विनंती केली होती. परंतु, तसे झाले नाही. चित्रपटाला आमचा विरोध नाही, परंतु यातील काही दृश्यांबद्दल आम्हाला आक्षेप आहेत. याबाबत कायदेशीर अर्ज पाठवला असून आम्ही चित्रपटाच्या निर्मात्यांना संवाद साधणार आहोत. संवादाने प्रश्न सुटला नाही तर कारवाई करण्याचा विचार करू.
