पुणे (प्रतिनिधी) : पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हिवताप विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने येत्या २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.पुणे येथील सहसंचालक आरोग्य सेवा (ही व ह) यांच्या कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती हिवताप संघटनेचे राज्य सरचिटणीस पी.एन.काळे यांनी दिली. हे उपोषण राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.

राज्यातील हिवताप विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक,आरोग्य पर्यवेक्षक यांना पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेमुळे मिळालेला नाही. या मागणीसाठी गेले वर्षभर आंदोलने, निदर्शने, मोर्चे काढून हिवताप संघटनेने आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. २ नोव्हेंबर पूर्वी शासनाने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.