कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील सहकारी बँकेस कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनतर्फे नागरी बँक श्रेणीमध्ये ठेवीबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व डी. वाय. पाटील बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी स्वीकारला.
यावेळी जिल्हा नागरी सह. बँक असोशिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम कारंडे, संचालक अरुण अलासे, वारणा बँक संचालक प्रमोद कोरे, विश्वेश कोरे, वारणा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळकर, त्याचबरोबर डी. वाय. पाटील सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन धैर्यशील घाटगे, संचालक संजय जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ मोर्ती, व व्यवस्थापक श्रीधर सांगले, सहाय्यक व्यवस्थापक संदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
इचलकरंजीची श्रीराम सहकारी बँक २०००-२००१ मध्ये डी. वाय. पाटील ग्रुपने अधिग्रहीत केली. डॉ. संजय डी. पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या बँकेने आपल्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल करत सातत्याने नफा मिळवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेने पारदर्शक कारभार करत अनेक गरजवंताना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. ऑडीट वर्ग ‘अ’ आणि शून्य एनपीए असलेल्या या बँकेला यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराने बँकेच्या पारदर्शक व सचोटीच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व सौ. शांतादेवी पाटील (आईसाहेब) यांचे आशिर्वाद, बंधू माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांची भक्कम साथ व बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मेहनत व सभासद, ठेवीदार यांचा विश्वास व सहकार्य यामुळे बँक हे यश मिळवू शकली. यापुढेही बँकेच्या माध्यमातून सभासद, नागरिकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यानी दिली.