उद्योजकतेला हवी सोशल इंजिनिअरिंगची जोड : गिरीश चितळे

कसबा बावडा ( वार्ताहर) : इंजिनिअर हा प्रॉब्लेम सॉल्व्हर असून त्याने आसपासच्या समस्या, गरजा लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. कोणताही उद्योग व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याला अशा सोशल इंजिनीअरिंगची जोड मिळणे गरजेचे असते. आधुनिक इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळेच चितळे उद्योग समूह आज गरुड झेप घेऊ शकला असे प्रतिपादन बी. जी. चितळे डेअरीचे संचालक आणि काँफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआयआय) महाराष्ट्र समन्वयक गिरीश चितळे यांनी केले.

सीआयआयआयच्या दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या इंडस्ट्री ॲकेडमी पॅनलच्यावतीने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित ‘सीईओ कनेक्ट’ उपक्रमामध्ये चितळे बोलत होते. महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट हेड प्रा. सुदर्शन सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली.

सीआयआयआयचे दक्षिण महाराष्ट्र समन्वयक आणि अलॉय स्टीलचे भागीदार रवी डोल्ली यानी स्वागतपर भाषणामध्ये ‘सीआयआयआय’च्या कार्याची माहिती दिली. शिक्षण क्षेत्राला उद्योग जगताशी भक्कमपणे जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. ही दोन्ही क्षेत्रे एकत्रित आल्यास सर्व आव्हान तोंड देणे शक्य आहे. यासाठी उद्योग जगतातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे असा आमचा प्रयत्न असल्याचे डोल्ली यांनी सांगितले.

मुख्य वक्ते गिरीश चितळे यांनी चितळे उद्योगसमूहाची मुहूर्तमेढ, त्याचा विस्तार, आलेल्या अडचणी व त्यावर इंजिनीअरिंगच्या साथीने केलेली मात याबाबत माहिती दिली. कोणतीही व्यवसाय करताना धाडस व चिकाटी आवश्यक आहे. आपल्या आजोबांनी अत्यत प्रतिकूल परिस्थितीत भिलवडी(सांगली) येथे पहिली भारतीय डेअरी सुरु केली. त्याकाळी वीज नव्हती. पुण्यातून बर्फ आणून दुध व त्याची उत्पादने विकण्यास सुरुवात केली.

व्यवसायात नवे प्रयोग करण्याची तयारी गरजेची आहे. आज जगप्रसिद्ध असलेली चितळे भाकरवडी ही मुळ गुजरातची. मात्र हा प्रकार महाराष्ट्रात आणून, त्यात अनेक बदल केले. यामध्ये आपल्या मकेनिकल इन्जिनिअरिगच्या ज्ञानाचा उपयोग केला. १९९५ पासून ही भाकरवडी आम्ही मशीनद्वारेच बनवत असल्याचे त्यानी सांगितले.

शेतकरी हा जगातील पहिला उद्योजक आहे. शेतीतील व्यावसायिकता ओळखून, तंत्रज्ञानांची जोड दिल्यास हा व्यवसाय निश्चितच फायदेशीर ठरेल. आपला व्यवसाय मोठा करताना इतरानाही उद्योजक बनवण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. चितळे समूहाने २० हजार उद्योजक कुटुंबे घडवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकी म्हणजे उत्तम नोकरी मिळवण्याचा मार्ग हा दृष्टीकोन बदलणे गरजेचे. अनुभव मिळवण्यासाठी काही वर्षे नोकरी जरूर करा पण त्यानंतर व्यवसायाकडे वळा. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डॉ. ज्योती जाधव यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थिनी जुई धारवाडे हिने सूत्रसंचालन केले तर हेड ट्रेनिंग प्रा. मकरंद काईगडे यांनी आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचलक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

🤙 9921334545