कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्टँडअप कॉमेडियन अशी ओळख असणारे राजू श्रीवास्तव यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.