कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट मार्गाची निश्चिती तातडीने करावी,कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेस आमदारांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिले.

ना. ज्योतिरादित्य सिंधिया आज शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आ.सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील, आ.जयश्री जाधव व आ.जयंत आसगावकर यांच्या सह्या आहेत. कोल्हापुरात शिंदे यांची आ.ऋतुराज पाटील, आ.जाधव, आ.आसगावकर यांनी हॉटेल सयाजी येथे भेट घेऊन विमानतळ विकासाबाबत चर्चा केली.
कोल्हापुर विमानतळावरील नाईट लँडिंग आणि सर्व हवामान ऑपरेशन्सला मान्यता दिल्याबद्दल कोल्हापूरवासियातर्फे केंद्रीय मंत्री शिंदे यांचे आ. सतेज पाटील व शिष्टमंडळाकडून आभार मानण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडे माजी मंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांनी पाठपुरावा केला होता. नाईट लँडिंगबाबत निर्देशित केलेल्या त्रुटी दूर करून प्रवाशांच्या सर्व सुरक्षिततेची खबरदारी घेतली होती. या सुविधांच्या मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिंदे यांचे आमदार पाटील यांनी आभार मानले.
ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाईट लँडिंग मार्ग अद्याप कोल्हापूरला मिळाला नसल्याने नाईट लँडिंग सुरू झालेले नाही. त्यामुळे कोल्हापुरात जाण्यासाठी व तेथून उड्डाण घेण्यासाठी नाईट लॅडिग मार्ग निश्चित करावा, कार्गो सुविधा सुद्धा लवकरत लवकर सुरु करावी, नागपूर, शिर्डी, गोवा, पुणे जोधपूर, जयपूर, दिल्ली, नांदेड आणि मुंबई या मार्गांवर रात्री उशिरापर्यंतच्या उड्डाणांना प्रवाशांकडून मोठी मागणी आहे. या संदर्भात, नवीन क्षेत्रे कोल्हापूर विमानतळाला देण्यात यावीत, प्रशिक्षणार्थीसाठी एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल) / फाइलिंग स्कूलसाठी हॅन्गर सुविधा उपलब्ध कराव्यात, विमानांसाठी रात्रीच्या पार्किंग सुविधा तयार करावी, एअरबस ए बी ३२० प्रकारच्या विमानाचे संचलन करावे, मोठी विमाने उपलब्ध नसल्यास प्रवासी संख्या जास्त असलेल्या मार्गांसाठी विमानांची फ्रिक्वेन्सी वाढवावीत,टर्मिनल इमारतीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे, बंगळुरू आणि अहमदाबादला जाणारी अनेक महिन्यांपासून बंद असणारी उड्डाणे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याच बरोबर ट्रुजेट दीर्घकाळापासून मुंबई फ्लाइट चालवत नसल्याने कोल्हापूर ते मुंबई मार्ग दुसऱ्या विमान कंपनीला देण्यात यावा, ट्रुजेट कंपनी नांदेड-मुंबई-कोल्हापूर असे वाटप केलेला मार्ग अनेक महिन्यांपासून चालवत नाही. या मार्गाला धार्मिक महत्त्व आहे आणि तो लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा,कोल्हापूर विमानतळाचा विकास आर सी एस योजनेअंतर्गत करण्यात आला. ट्रुजेटला हा मार्ग आरसीएस अंतर्गत देण्यात आला होता. कोल्हापूर आरसीएस प्रकल्पांना जास्तीत जास्त आरसीएस मार्ग आणि फ्लाइट ऑपरेटरचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.