कोल्हापूर प्रतिनिधी : चौगलेवाडी (ता.हातकणंगले) येथील दूध उत्पादकांच्या जनावरांना लागण झालेल्या ‘लंम्पीस्कीन त्वचारोग’ बाधित जनावरांची पाहणी कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केली. यावेळी संचालक डॉ.सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि, लंम्पीस्कीन हा रोग जनावरांच्या त्वचे संबंधीत आजार असून हा संसर्गजन्य रोग आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. तसेच अति प्रमाणात लागण झालेले जनावर दगावण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादकांनी आजारी जनावरे व इतर जनावरे एकाच गोट्यातून बाजूला करावीत. दूध उत्पादकांनी आजारग्रस्त जनावरांची सेवा करताना हात मोजे वापरावेत अशा सूचना देखील पाटील यांनी दिल्या. संघाच्या व सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने औषध उपचार करणे फार गरजेचे आहे. हा आजार रोखण्यासाठी गोकुळचे वैद्यकीय पथक तयार करून आवश्यक त्या उपयायोजना दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन करण्यात येणार आहेत. तसेच संघाशी संलग्न सर्व दूध संस्थाना या त्वचारोगाबद्दल माहिती व त्यावर उपाय असलेले परिपत्रक संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत संस्थाना पाठवले जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, अतिग्रे येथील चौगलेवाडी येथील अजित विलास चौगुले, दादा चौगुले, आदित्य काकासो चौगुले, दिनकर रामू पाटील, उदय श्रीधर पाटील, सखाराम गोपाळ मुसळे, काकासो कल्लाप्पा चौगुले, चंद्रशेखर माणिक पाटील या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन जनावरांची पाहणी केली.
यावेळी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, सहा.व्यवस्थापक डॉ.पी.व्ही.दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, दूध संकलन अधिकारी आर.एन. पाटील, विस्तार पर्यवेक्षक विक्रम पाटील यांच्यासह गावातील दूध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.