कोल्हापूर : तब्बल ७ थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने ३७ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी महाडीक युवाशक्ती दहीहंडी गडहिंग्लजच्या नेताजी पालकर संघासह तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाहून सरस कामगिरी करून संघर्ष पथकाने बाजी मारली. तब्बल ३ लाखांच्या बक्षिसासह इतर विविध प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन या गोविंदा पथकांचा गौरव करण्यात आला.

५० फुटांवर बांधलेली युवा शक्ती दहीहंडीसाठीची सलामी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाली. नेताजी पालकर संघाने ६ थर रचून यंदा सलग सहावी दहीहंडी फोडण्याचा इशारा दिला. संघाचे प्रमुख कै. नेताजी पालकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. लता पालकर यांनी संघाचे नेतृत्व केले. पाठोपाठ संघर्ष पथकाने ५ थर रचून आपणही सज्ज असल्याचे सांगितले. तासगावच्या शिवगर्जनानेही सहा थर रचून आपणही दहीहंडी फोडू शकतो याची झलक दाखविली.

यानंतर चिमुकल्या मुलीच्या हस्ते लॉट्स पाडण्यात आले. त्यानुसार तिन्ही संघांच्या प्रयत्नानंतर दहीहंडीची उंची प्रत्येक फेरीवेळी कमी करण्यात आली. चौथ्या प्रयत्नात संघर्ष गोविंदा पथकाने ७ थर रचत दहीहंडी फोडली. सोनू राजू कोरवी या बालगोविंदाने सर्वात वरच्या थरावर जाऊन हे अवघड लक्ष्य साध्य केले. रात्री पावणे दहा वाजता दहीहंडी फोडण्याचा संघर्ष गोविंदा पथकाला यश आले.
