कोल्हापूरच्या राजकारणात आता महाभारतच, वाईटाचा नाश होणार : खा. महाडिकांचा सतेज पाटील यांना टोला

कोल्हापूर : ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी कूटनीती, कपटनीतीने लोकसभेला माझा घात केला होता. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला झेपणार नाही, असे मी म्हणालो होतो. आता आमचे सरकार आलं आहे. आता कोल्हापूरच्या राजकारणात इथून पुढे महाभारतच होणार, आणि वाईटाचा नाश होणार, तसेच पुढच्या सर्व निवडणुकात भाजप व मित्रपक्षच विजयी होणार, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना दिला.

महाडिक युवा शक्तीच्यावतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित केलेल्या दहीहंडीप्रसंगी ते बोलत होते.

धनंजय महाडिक म्हणाले की, गेल्या काही दिवसात महाडिक गटाचे सलग पराभव झाले. विरोधकांनी खोट्या केसेस दाखल करून महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला. यामुळे येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार. तसेच,कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदा अशा सर्व निवडणुकीत भाजप – शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल.

महाडिक म्हणाले, विधानसभा, लोकसभा त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाडिक परिवाराला आणि भाजपलाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते.पण राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या आशीर्वादाने आपण अवघड असा सहावा थर ‘रचला. भाजपच्या नेत्यांमुळेच हे शक्य झाले. राजकारणात कोण कायमचा शत्रू नसतो. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदय नक्कीच होत असतो. सर्व सत्तास्थाने गेल्यानंतर ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. पंढपूरमधील कारखान्याचे दीड हजार सभासद रद्द केले. राजाराम साखर कारखान्याचे एक हजार सभासद रद्द केले. आमचा कारखाना, शिक्षण संस्था प्रशासनावर दबाव आणून बंद पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर व कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले. कपटनीतीने ते जिंकले असले, तरी ‘आम्ही तसे करणार नाही. जिल्ह्यातील सर्व विकासकामे मार्गी लावण्यात येतील.

🤙 9921334545