तावडे हॉटेल चौकातील वाहतुकीची कोंडी सोडवा; करवीर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील पूला खालील वाहतुकीची कोंडी सोडवा, अशी मागणी शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गणपती उत्सव, दसरा व दिवाळी सण व सुट्यांची अधिक संख्या असलेला हा महिना कोल्हापूरात महालक्ष्मी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी व शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. तावडे हॉटेल चौकामध्ये पुल अरूंद असल्याने तसेच गांधीनगरलाही खरेदीसाठी जाणारी वाहनांची संख्या अधिक असल्याने त्या तावडे हॉटेल पुलाखाली वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. कोल्हापूरात येणाऱ्या वाहनांची रांग राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा पुलापर्यंत लांबच्या लांब लागलेली असते. त्यावेळी कमीत कमी तास ते दिड तास वाहतुकीच्या कोंडीचा त्रास शहरात येणाऱ्या व गांधीनगरला खरेदीला जाणाऱ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. गांधीनगर भागात हायवे पुलाच्या पुर्वेस गांधीनगर पोलिसांची वाहतुकीची टिम उपलब्ध असते पण हायवे पुलाच्या पश्चिमेस शहरातील कोणतीही वाहतूक पोलिस किंवा शाहुपूरी पोलिसांची यंत्रणा नसल्याने वाहनांना तासन तास त्या भागात कोंडी करून थांबावे लागते. त्यासाठी शहर भागातील वाहतुक शाखा असेल किंवा शाहुपूरी पोलिस यंत्रणा त्या भागात नियोजनासाठी उभी करणे गरजेचे आहे. तशा सुचना आपल्या खात्याकडून संबंधीतांना व्हाव्यात व त्या पुलाखाली तासनतास होणारी वाहतुकीची कोंडी सोडवावी. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांना देण्यात आले.

यावेळी संकेत गोसावी यांनी तावडे हॉटेल चौकातील हायवे पुलाखालील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतो याची मला कल्पना आहे अशी कबुली दिली. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करू असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट,कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, मा.उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, उंचगाव गाव प्रमुख दिपक रेडेकर, हिंदुत्ववादी शरद माळी, योगेश लोहार, शैलेश नलवडे, बाळासाहेब नलवडे,युवासेनेचे प्रफुल्ल घोरपडे, शिवराज करी, दिपक पोपटाणी,दिपक अंकल,दिपक धिंग, तायाप्पा कांदेकर, पै. बाबुराव पाटील आदी उपस्थित होते.