नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांनी सत्तेपासून काडीमोड घेतल्याने राज्यातील भाजप जेडीयुचे सरकार कोसळले असून नितीश कुमार आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.

काही दिवसांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू होते. बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांना हटवावे,अशी नितीश यांची इच्छा होती. यासंदर्भात त्यांनी सिन्हा यांच्याबाबत अनेकदा खदखद व्यक्त केली होती. सिन्हा यांनी उघडपणे आपल्या सरकारवर प्रश्न उपस्थित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप नितीश कुमारांनी केला होता.

तसेच जून २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये जेडीयूला एकच पद ऑफर करण्यात आल्यानंतर नितीशकुमार भाजपवर नाराज झाले होते. तर बिहारच्या विस्तारित मंत्रिमंडळात त्यांनी पक्षाच्या आठ सहकाऱ्यांचा समावेश करून त्याचा बदला घेत फक्त एक जागा भाजपसाठी रिकामी ठेवली होती.
दरम्यान, भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय नितीश कुमार आणि जेडीयूने मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही तयार केल्याचे बोलले जात आहे.