कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोमल पाटील यांना एक दिवसांकरिता सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे सरपंच दिपाली जांभळे यांनी सांगितले.

पतीच्या निधनानंतर कोमल पाटील यांनी मंगळसूत्र, चुडा व सौभाग्याचं लेणं तसंच ठेवून विधवा प्रथेला प्रत्यक्षरित्या मूठमाती देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान केला जाणार आहे. कोमल यांचे पती राम बळवंत पाटील हे बोलोली येथे विजेच्या डी. पी. दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून मयत झाले होते. ११ जुलै रोजी ही घटना घडली होती. राम हे स्वभावाने मनमिळाऊ व लोकांची कामे करण्याची आवड असल्याने सांगरुळ परिसरात वायरमन म्हणून लोकप्रिय होते. डी. पी. वर काम करताना विजेचा धक्का बसून ४५ टक्के भाजले होते. त्यांच्या प्रकृतीसाठी बारा वाड्यातील लोकांनी स्वयंभू देवस्थान येथे अभिषेक घातला होता. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते.

वायरमन असलेल्या पतीच्या निधनानंतर पत्नी कोमल यांनी मंगळसूत्र, चुडा व सौभाग्याचं लेणं तसंच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेणारी खुपिरे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातीळ तिसरी ग्रामपंचायत आहे. कोमल यांच्या धाडसाचा सन्मान करण्याचा निर्णय खुपिरे ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यांना एक दिवसाचा सरपंच करण्याचा निर्णय घेतला आहे.