आनंद दिघेंबाबत २५ वर्षे का गप्प होता?; ‘यांचा’ एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले, याबाबत ज्यावेळी मी मोठा खुलासा करीन, त्यावेळी राजकीय भूंकप होईल, असा इशारा शिंदेंनी दिला होता. मात्र या विधानानंतर आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघेंनी सणसणीत ट्विट करत एकनाथ शिंदेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले. आनंद दिघे यांच्याबाबत तुम्ही आजपर्यंत गप्प का बसला? असा थेट सवाल केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये केदार दिघे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार.मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. शिंदे हे आपल्या प्रत्येक भाषणात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव आवर्जून घेतात. नाशिकमध्ये ही त्यांनी तेच केले मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर शिंदे आनंद दिघे यांच्याबाबत कोणता खुलासा करणार? हा सस्पेन्स तयार झाला आहे. मात्र त्यालाच आता केदार दिघे यांचे तिखट सवाल आल्याने मुख्यमंत्री या प्रश्नांना कशी आणि काय उत्तरं देणार? हेही पाहणे तितकच महत्त्वाचे ठरणार आहे.