मुंबई (प्रतिनिधी) ;हिंगोली लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची बुधवारी घर वापसी झाली असून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हयाच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे. खासदार हेमंत पाटील शिंदे गटात गेल्याने आगामी लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघातून सन 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर सुभाष वानखेडे विजयी झाले होते. मात्र त्यानंतर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने वानखेडे नाराज झाले. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर काही दिवसांतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्येही त्यांचे मन रमलेच नाही.
दरम्यान, मागील काही दिवसांत शिवसेनेमध्ये शिंदे गट वेगळा झाल्याने राजकिय उलथा पालथ सुरु झाल्या. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी शिंदेगटात सहभाग घेतल्यानंतर शिवसेने पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच मागील दोन दिवसांपासून माजी खासदार सुभाष वानखेडे यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव हे वानखेडे यांच्या संपर्कात होते. वानखेडे यांनी पुन्हा शिवबंधन बांधण्यास होकार दिल्यानंतर आज मुंबईत तातडीने कार्यक्रम घेण्यात आला.
मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत वानखेडे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी नागेश पाटील आष्टीकर, विनोद हामने, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, माजी उपसभापती अजय उर्फ गोपू पाटील सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, डॉ. शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छावादलाचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. वानखेडे व भिसे यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट माजी खासदार सुभाष वानखेडे यांना दुरध्वनीवरून संपर्क केला. दोघांमध्ये झालेल्या संभाषणानंतर पक्ष प्रवेशाला मुहुर्त लागल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे वानखेडे नाशिक येथून येत असतांनाच त्यांना दुरध्वनी आल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या.