कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर सहभागी झाले. त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते ओरिजनल शिवसैनिक असल्याचे जाहीर करत आपण ठाकरेंबरोबर राहणार असल्याचे जाहीर केले. तर धैर्यशील माने यांनीही ठाकरे यांना साथ देण्याचे जाहीर केले. मात्र आता त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याने बेंटेक्स कोण आणि ओरिजनल कोण यावरून शिवसैनिक चक्रावले असून धनुष्यावर बाण कोणाचा याबाबत संभ्रम आहे.

नाही नाही म्हणता म्हणता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हेदेखील शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने यांनीदेखील याच मार्गावरून जाण्यासाठी ‘बाण’ ताणून धरला असल्याची चर्चा आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेने भगवा फडकवताना मंडलिक आणि माने यांना निवडून दिले. कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेवर सेनेचा झेंडा फडकला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पाठोपाठ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सहभागी झाले. त्यानंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांची नावे चर्चेत येऊ लागली, पण दोघांनीही आपण शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली.
राज्यातील बहुसंख्य खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने आपण तरी कशाला सेनेत राहायचे या मानसिकतेत मंडलिक असल्याचे समजते. सत्तेबरोबर जाऊन विकास करण्यासाठी त्यांनी आता शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हमीदवाडा येथे मेळाव्यात कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरला आहे. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बाण ठेऊन शिंदे गटाचा धनुष्य मंडलिक उचलण्याची शक्यता आहे.
तर हातकणंगलेचे खासदार धैर्यशील मानेही वेगळी वाट पकडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याअगोदर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत नको अशी भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशी आहे.
शिंदे गटात जाण्याकडे जिल्हा बँकेचे राजकारणही यात दडले आहे. वीरेंद्र मंडलिक यांचा गोकुळमधला पराभव हे पण कारण आहे. मंडलिक माने शिंदे गटात गेल्यास जिल्हा बँकेत सत्ता परिवर्तन होऊ शकते.