नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बिगरभाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर या पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती. त्यात आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत सुरू झालेल्या राजकीय घडामोडींची देखील भर पडली आहे. आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बिगरभाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली.
आज दुपारी दिल्लीतील शरद पवारांच्या ६ जनपथवरील निवासस्थानी बिगर भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकूण १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमताने मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. “सर्व बिगर भाजपा पक्षांपैकी अनेकांशी आमची चर्चा झाली. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून आम्ही एक उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला. मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्य देखील होत्या. आम्ही काही नावांवर चर्चा केली आणि शेवटी एकमताने मार्गरेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
विरोधी पक्षांचा अल्वा यांच्या नावाला पाठिंबा असल्याचं शरद पवार म्हणाले. “काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसव्ही, मणी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएल, नॅशनल काँग्रेस, आरएलडी अशा एकूण १९ पक्षांचा पाठिंबा अल्वा यांच्या उमेदवारीसाठी मिळाला आहे. आम्ही ममता बॅनर्जींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या बैठकीमध्ये होत्या. आम्ही अरविंद केजरीवाल यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून असा निरोप आला आहे की त्यांनी ज्याप्रमाणे विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पाठिंबा दिला, तसाच देखील ते पाठिंबा देतील”, असं देखील पवार म्हणाले.
येत्या मंगळवारी अर्थात १९ जुलै रोजी मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्ष जाणार असल्याचं देखील शरद पवारांनी यावेळी सांगितलं.