कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांना वैयक्तिक कार्यालयीन कामकाज करता यावे. संघटना प्रतिनिधींनाही संघटनात्मक कार्याचा पाठपुरावा प्रशासकीय पातळीवर करता यावा यासाठी राज्यातील सर्व शाळा प्रत्येक महिन्याच्या दुसत्या व चौथ्या शुक्रवारी सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश संबधितांना देण्यात यावेत, अशी मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेल पाठवून निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केल्याने शनिवारी सर्व कार्यालये बंद असतात, सेवापुस्तक नोंदी अद्ययावत करणे, रजेचा हिशेब पाहणे, भविष्य निर्वाह निधी प्रकरण अथवा वैद्यकीय बील पाठपुरावा, इतर कामकाज त्रुटींची पूर्तता, झालेले प्रशिक्षण अथवा वाढवलेली शैक्षणिक अर्हता नोंद करणे आदी अनेक वैयक्तिक कार्यालयीन कामे असतात.
पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून शिक्षकांना वैयक्तिक कामकाजासाठी रजा घेऊन जावे लागत आहे. संघटना प्रतिनिधींनाही संघटनात्मक कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी रजा घेवूनच जावे लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य नेते विजय भोगेकर, हरिश ससनकर आदींच्या सह्या आहेत.