मातोश्रीवरील बैठकीला खासदार संजय मंडलिक यांची दांडी

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे बहुतांश खासदारही एकनाथ शिंदे  गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेच्या राज्यातील सर्व खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर बोलवली होती. या बैठकीला शिवसेनेच्या सहा खासदारांनी दांडी मारली. यात कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा समावेश आहे.

राज्यात ४८ पैकी शिवसेनेचे १८ खासदार आहेत. या खासदारांपैकी एकूण १२ खासदार मातोश्रीवर उपस्थित होते. तर सहा खासदार अनुपस्थित आहेत. हे खासदार नेमक्या कुठल्या कारणामुळे अनुपस्थित आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात काही खासदारांनी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून मागणी केली आहे. या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिले. अनुपस्थित खासदारांमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने दिल्लीमधील बैठकीला उपस्थित राहिल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचा खुलासा त्यांनी सांगितले.