कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत एकही पदाधिकारी गेला नाही. शिवसेनेचा ताकदवान जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा राहील असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. कोल्हापुर येथे आज (रविवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, डबल ढोलकी म्हणून जे वागत होते त्यांना पदमुक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील उत्तर दक्षिण मतदार संघातील कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून येत्या १४ जुलै रोजी शहर शिवसैनिकांचा दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वा.मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या पत्रकार परिषदेला खासदार संजय मंडलिक, विजय देवणे, कोल्हापूर शहर प्रमुख रविकरण इंगवले, सुनील मोदी, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, रवी चौगुले, स्मिता मांढरे, राजू यादव रणजित आयरेकर, सुशील भादिंगरे,शशी बिडकर,दत्ता टिपुगडे, प्रीती क्षीरसागर आदी उपस्थित होते.