संततधार कायम; पंचगंगा नदीची पाणी पातळी सात फुटांनी वाढली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी एका रात्रीत सात फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत.

पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी २४ फूट ५” इंच इतकी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ८ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा
जिल्ह्यात ८ जुलै २०२२ पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी काल दुपारी २ वाजता कोल्हापूर येथून २ मिनीबस व ८ कार मधून अंदाजे ७०- ८० पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी ५ वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरुप बाहेर पडली आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते. अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

🤙 9921334545