राज्याध्यक्षपद टिकवण्यासाठी बँकेला वेठीस धरणाऱ्यांनी आमच्यावर बोलण्याची नैतिकता तपासावी : रवी पाटील

शिरोळ (प्रतिनिधी) : सत्तारूढ आघाडीचे नेते आमच्या आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे निराश झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे त्यामुळे नैराश्यातून बँकेच्या कारभाराबद्दल न बोलता ते आघाडीवर बेताल वक्तव्य करत आहेत, असा घणाघाती आरोप राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीचे नेते रवी पाटील यांनी केला.

राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या शिरोळ तालुका प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले विरोधी आघाडीच्या या नेत्यांनी आपले राज्याध्यक्षपद सांभाळण्यासाठी कार्यकर्त्यांचा व दुसऱ्या फळीतील नेत्यांचा वापर करून घेतला. आपली पोळी भाजून घेतली. आपले पद टिकवण्यासाठी सतरा भानगडी केल्या. स्वार्थ साधल्यानंतर त्यांनाच दूर सारले. हे जिल्ह्यातील शिक्षकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा निरुत्साह जिल्हा पाहत आहे. त्यामुळेच आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. स्वार्थाने बरबटलेल्या या हुकूमशहाने आता नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. बँकेचा पैसा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी संघटनेसाठी खर्च करून सभासदांची आर्थिक लूट केली आहे. आम्ही सत्तेत असताना आमच्या काळातच बँकेचा कर्ज पुरवठा पूर्ववत सुरू करून जिल्हा बँकेची 25 कोटींची सी सी बँकेत भरली. ठेवी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून ठेवीमध्ये वाढ झाली म्हणूनच सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हास परत निवडून दिले आणि विरोधी आघाडीच्या नेत्यांलाच सभासदांनी नाकारले याचे सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावे स्वतः निवडणूक हरलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मनातून हरलेली उमेदवारांची होयबा टोळी आहे. हे उमेदवार जिंकणार नाहीत याची नेत्यालाही कुणकुण लागल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. गमावलेल्या विश्वासहर्ता आणि पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते बेतालपणे बोलत सुटले आहेत.त्यांच्या या बेताल वक्तव्यांची सभासदांनाही कीव येऊ लागली आहे. गेली तेरा वर्ष बँकेला तोट्यात घालणाऱ्या या भ्रष्ट आणि पैसा खाण्याचा भस्म्या रोग जडलेल्या सत्ताधार्‍यांना दूर सारण्याचा निर्धार सभासदांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटना आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते परिवर्तनासाठी सज्ज झालेत. येत्या चार तारखेला स्वाभीमानी शिक्षक सभासद विजयाचा गुलाल उधळून शाहू विचारांचा जयजयकार करतील.

यावेळी प्रमोद तौंदकर, जोतीराम पाटील, सुनील पाटील, सुनील एडके यांनी मनोगते व्यक्त केली.
स्वागत विजय भोसले व प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले. आभार किरण पाटील यांनी मानले .
मेळाव्याला माजी चेअरमन बजरंग काळे, दिनकर पाटील, माजी संचालक सुभाष निकम, रावसाहेब देसाई, भगवान कोळी, सुरेश पाटील, विजय भोसले, रईस पटेल मोहम्मद मुल्ला आदी उपस्थित होते