पाठीत खंजीर खुपसणाऱ्या प्रवृत्तींना रोखा; राजेंद्र मांडेकर यांना विजयी करा : राजाराम वरुटे

कोल्हापूर : शिक्षक बँकेचे गडहिंग्लज तालुक्यातील  आजी-माजी संचालक विरोधकांच्या हाती लागले आहेत. ज्यांना कार्यकर्त्यांनी मोठे केले, निवडून दिले, नेतेपद बहाल केले. तेच नेते कार्यकत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून विरोधकांना जाऊन मिळाले, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवे. तालुक्यातील सर्वसामान्य शिक्षकांनी याचा बदला म्हणून सत्तारुढ शिक्षक संघ प्रणित उमेदवार राजेंद्र मांडेकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे व पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना कायमचे घरात बसवावे असे आवाहन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष, सत्तारुढ गटाचे नेते राजाराम वरुटे यांनी केले.

गडहिंग्लज तालुक्याचे उमेदवार राजेंद्र मांडेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भर पावसात झालेल्या सभेला शिक्षक सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. महिला सभासदांची संख्या लक्षणीय होती.

 बँक नफ्यात आणल्याचे सांगत वरुटे म्हणाले, सुरुवातीस १५ टक्के असणारा कर्जाचा व्याजदर सध्या दहा टक्केपर्यंत खाली आणला आहे. यापुढे पतसंस्थांच्या व्याजदराप्रमणे कमीतकमी व्याजदर आकारणी करून शिक्षकांना दिलासा देउ. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सभासदांना सुविधा उपलब्ध करू.शिक्षकांचे प्रश्न मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करुन सोडवले आहेत.

 उमेदवार राजेंद्र मांडेकर यांनी आतापर्यंत शिक्षकासाठी केलेल्या कामाची मांडणी केली.त्या कामाच्या जोरावर आपण बहुमताने निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे यांची भाषणे झाली.

मेळाव्यास कार्याध्यक्ष शंकर कोले,  मारुती साबळे, तानाजी जमाटे,  भगवंत कांबळे, राजू चौगुले, धोंडिबा वांद्रे, दिलीप होडगे-पाटील, विलास जाधव, विष्णु बेनके, ईश्वर शिंदे, अशोक जाधव, राजू सुतार, एकनाथ पाटील, शशीकला पाटील, उत्तम यमगेकर, शिवाजी पोवार, शिवाजी गुरव उपस्थित होते.

पांडूरंग सुतार यांनी प्रास्ताविक केले. विलास माळी यांनी सूत्रसंचालन केले. राजू चौगुले यांनी आभार मानले.

🤙 9921334545