राजर्षी शाहू स्वाभिमानी पॅनलच विजयाचा गुलाल उधळणार : शिक्षक नेते शंकरराव मनमाडकर

चंदगड : गेली अनेक वर्ष सभासदांच्या हिताशी खेळ करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी स्वाभिमानी सभासदांची आघाडी निर्माण झाली आहे. ही आघाडी सत्तेच्या दलालांना सत्तेपासून दूर सारणार आणि शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षक बँकेवर राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचा झेंडा फडकवत विजयाचा गुलाल उधळणार, असा विश्वास शिक्षक नेते शंकरराव मनमाडकर यांनी व्यक्त केला.

     प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणूकीनिमित्त राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या चंदगड तालुक्यातील आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

    मनमाडकर पुढे म्हणाले, शिक्षक बँकेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजून सभासदांची आर्थिक लूट करणाऱ्या लुटारूंना सत्तेपासून दूर ठेवण्याची वेळ आलेली आहे. या निवडणूकीत शिक्षक बँकेत परिवर्तन अटळ आहे. या ऐतिहासिक परिवर्तनाच्या लढाईचे शिल्पकार आणि साक्षीदार बनण्याची संधी सभासदांना उपलब्ध झाली आहे. चंदगडचे स्वाभिमानी शिक्षक सभासद हे १०० टक्के या पॅनलच्या पाठीशी उभे आहेत आणि या पॅनलला बहुमताने निवडून देतील .शिक्षक बँक ही सामान्य सभासदांची आहे. सामान्य सभासद हा या बँकेचा मालक आहे. तर सभासदांनी निवडून दिलेले संचालक हे विश्वस्त असतात. विश्वस्तानी विश्वस्थासारखं काम करावं. पण, दुर्दैवानं विश्वस्थ मालक असल्यासारखे वागू लागले आहेत. त्यामुळे शिक्षक बँकेची मोठ्या प्रमाणात लूट झाली. मालक असणारा सभासद आर्थिकदृष्ट्या पिळला गेला. सभासदांनी आजपर्यंत झालेली ही लूट जाणली आहे. त्यामुळे ही निवडणूक सामान्य सभासदांनी आपल्या हातामध्ये घेऊन यावेळी बँकेतून सत्ताधाऱ्यांना दूर करण्याचा निर्धार केला आहे. यामुळेच या आघाडीला जिल्हाभरातून उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे. वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन सर्वांची ताकद एकत्र करून हा विजयाचा गुलाल उधळणार आहोत असा विश्वास मला वाटतो.

यावेळी जोतिराम पाटील म्हणाले, शिक्षक बँकेमध्ये परिवर्तन करावं, यासाठी कोणताही स्वार्थ न ठेवता सुकाणू समितीने सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका निभावली आहे. आमच्या सुकाणू समितीमध्ये सहभागी असणारे सर्व सदस्य हे शिक्षक बँकेचे सभासद आहेत. त्यामुळे सभासदांच्या व्यथा आणि वेदना ते जाणतात. सभासदांची होणारी आर्थिक पिळवणूक ते स्वतः अनुभवतात. या पिळवणुकीतून मुक्तता करण्यासाठीच ही आघाडी निर्माण झाली आहे. जी सभासदांच्या आर्थिक आणि मानसिक पिळवणुकीच्या बेड्या तोडेल आणि बँकेला मोकळा श्वास देईल.

 यावेळी शिक्षक संघाचे सरचिटणीस सुनील पाटील, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नेते एम. टी. कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.

 या मेळाव्यास तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, सरचिटणीस एन. व्ही. पाटील, बाबुराव परिट, पेडणेकर सर, गोविंद पाटील, प्रशांत पाटील, ए. के. पाटील. वांद्रे सर, सुभाष चौगुले, सतीश तेली, बाजीराव पाटील, मारुती पाटील, मोहन पाटील, मधुकर मुसळे, शिवाजी ठोंबरे, विलास चौगुले आदी उपस्थित होते

   

🤙 8080365706