कोल्हापूर : सभासदांच्या हितासाठी ओवरड्राफ्ट ही अभिनव कर्ज योजना सुरू करणार आहोत. ज्याद्वारे सभासदांना आवश्यक त्या रक्कमेचे कर्ज मंजूर करून घेता येईल. पण आपल्याला गरज लागेल तेवढीच रक्कम काढता येईल. काढलेल्या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाईल. त्यामुळे सभासदांना संपूर्ण कर्ज रकमेवर भराव्या लागणाऱ्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. याद्वारे सभासदांना आर्थिक सहकार्य करता येईल, अशी ग्वाही शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.

राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या करवीर तालुका प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. ते रवी पाटील पुढे म्हणाले, दिवसेंदिवस सहकारी संस्थांसमोर नवनवी संकटे उभी राहात आहेत. अशावेळी प्रयोगशीलता राखत नाविन्यपूर्ण योजना राबवाव्या लागतील. सत्ताधारी मंडळींना याची मुळीच जाण व दृष्टी नसल्यामुळे कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ बँक लुटण्याची एकमेव योजना त्यांनी राबविली आहे. सभासदांच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या स्वार्थी प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठीच राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी समोर आली आहे. जिल्हाभरातून शिक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता परिवर्तन होणार ही काळ्य दगडावरची रेघ आहे.
या मेळाव्यात पदवीधर शिक्षक संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना उर्दू शिक्षक भारती, अखिल भारतीय शिक्षक संघ, कास्ट्राईब कल्याण महासंघ, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक महासंघ यांनी जाहीर पाठिंबा दिला. या सर्व संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार पॅनलच्या वतीने करण्यात आला.
पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील म्हणाले, मंत्री महोदयांच्या सहकार्यातून व आमच्या संघटनेच्या माध्यमातून मंत्रालयस्तरावरील, जिल्हा परिषदस्तरावरील शिक्षकांच्या सोडवलेल्या प्रश्नांचे श्रेय स्वतः लाटून आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कारभाऱ्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार आहोत. आम्हाला गृहीत धरून जर कोणी वागत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. आमची संघटना ही स्वाभिमानी बाणा जपणारी आहे म्हणूनच आम्ही स्वाभिमानी आघाडीला पाठिंबा दिला आहे.
यावेळी मंगेश धनवडे, एस. व्ही. पाटील, पद्मजा मेढे, प्रमोद तौंदकर, सुनील पाटील, बाळासाहेब पवार, जोतिराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली .
या मेळाव्याला तानाजी घरपणकर संजय दाभाडे, शिवाजीराव ठोंबरे, उस्मान पटेल, प्रकाश मगदूम, सुरेश सोनगेकर, गुरुराज हिरेमठ, रघुनाथ खोत, आनंदराव जाधव, विलास चौगुले, अर्जुन पाटील, राजेश सोनपराते, राजू परीट, प्रभाकर कमळकर आदी उपस्थित होते. स्वागत वर्षा केनवडे यांनी केले. प्रास्ताविक ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संदीप मगदूम यांनी केले आभार संजय कुर्डूकर यांनी मानले
