पन्हाळा : एक नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षक बांधवांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर लाभ देणारी कोणतीही योजना शिक्षक बँकेत कार्यान्वित नाही. त्यामुळे अशा सर्व एनपीएस बांधवांसाठी अत्यंत उत्कृष्ट अशी योजना बँकेमार्फत राबवणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडनुकीत राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या प्रचारासाठी पन्हाळा येथे डीसीपीएसधारक शिक्षकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ते बोलत होते.
धनवडे पुढे म्हणाले, या डीसीपीएसधारक शिक्षक बांधवांसाठी कोणतीही ठोस अशी योजना कार्यन्वित नाही. शिक्षक बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला अथवा सेवानिवृत्तीनंतर त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पतपेढी, बँक यांचाच आधार आहे. अशावेळी प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक विकासाची केंद्रबिंदू असणारी प्राथमिक शिक्षक बँक ही डीसीपीएसधारक शिक्षकांसाठी आधारवड ठरावी म्हणूनच आम्ही राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. इतर संघटनांनी आमच्या युवा शिक्षकांना झुलवत ठेवले. पण या आघाडीने तरुण शिक्षकांना संधी देऊन आम्हा तरुणांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास पात्र राहून जिल्ह्यातील दोन हजार शिक्षक राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीला विजयी करतील असा विश्वास वाटतो.
यावेळी जोतिराम पाटील म्हणाले ज्येष्ठांचा आदर व तरुणांची कदर करून तयार झालेली ही आघाडी आहे. तरुणांच्या ज्ञानाला संधी देण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे. युवकांच्या मनात सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असणारा प्रक्षोभ या निवडणुकीत मतपेटीतून दिसून येईल आणि ही निवडणूक युवा सभासदांच्या जोरावरती ही आघाडी जिंकेल.
यावेळी रवी पाटील, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, बाजीराव पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले, राजू परीट, बाळासाहेब पोवार, रामदास झेंडे, अमर वरुटे, जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, राज्य सह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील, राज्य प्रतिनिधी प्रकाश गुट्टे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल कांबळे, जिल्हा सल्लागार संजय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष बी. एल. कांबळे, राहुल जाधव जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष अमर वरुटे, चंदगड तालुकाध्यक्ष आनंदा कांबळे, गडिंग्लज तालुकाध्यक्ष आनंद पाटील, शिरोळ तालुकाध्यक्ष संतोष दुबळे, गगनबावडा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष मारुती पवार, कागल तालुकाध्यक्ष संदीप पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष दिपक गायकवाड, आजरा तालुकाध्यक्ष सत्यवाद सोने, शाहूवाडी तालुकाध्यक्ष उमेश कुंभार यांच्यासह डीसीपीएसधारक शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.