कोल्हापूर : केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जल जीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हयात जल जीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून जिल्हयात एकूण 1 हजार 534 योजनांचा 921 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर, नल से जल’ या घोषवाक्यानुसार या प्रकल्पांतर्गत सन 2024 पर्यंत प्रती व्यक्ती प्रती दिन 55 लिटर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करणेचे उददीष्ट आहे. या उद्दीष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन राबविणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आराखडयानुसार एकूण 1305 योजनांची अंदाजपत्रके तयार केली असून 939 योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच 609 योजनांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या असून उर्वरीत योजनांच्या निविदा प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरू आहे. आराखडय़ात मंजूर कामांची अंदाजपत्रके व निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व कामे तात्काळ सुरू करण्याच्या पाणी पुरवठा विभागास सूचना दिल्या आहेत.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सद्यस्थितीस जिल्हयातील 6 लाख 88 हजार 434 कुटुंबापैकी आज अखेर 5 लाख 31 हजार 068 इतक्या कुटुंबांना कार्यात्मक नळजोडणी देण्यात आलेली असून ग्रामपंचायत मार्फत नळजोडणीचे काम प्रगतीपथावर आहेत. जिह्यातील सर्व शाळा व अंगणवाडय़ांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच प्रस्तावित योजना व प्रगतीपथावरील योजना कार्यान्वीत झाल्यानंतर उर्वरित ठिकाणी नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत अतिदुर्गम भागातील लोकांनाही टंचाई काळात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेअंतर्गत एकूण 89 वाडया वस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण, तसेच वेगाने पूर्ण होतील यासाठी सर्वांनी कार्यक्षमपणे काम करावे व ग्रामस्थांनीही त्यांचा सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
