बहिरेश्वर (प्रतिनिधी ) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी बापू दिंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी करवीरचे सहनिबंधक बी. के. पाटील होते.
कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने आपली सत्ता अबाधित राखली आहे.
चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीवेळी बी. के. पाटील यांनी नूतन संचालकांना सेवा संस्था इमारत नुतनीकरणासाठी प्रयत्न करा, एकच सेवा संस्था असल्याने गिरण विभाग , पाणी पुरवठा, धान्य विभाग फायद्यात आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असा कानमंत्र दिला.
याप्रसंगी माजी सरपंच सूर्यकांत दिंडे, पी. आर. पाटील, कुंभी चे माजी व्हाईस चेअरमन शामराव गोधडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे मावळते चेअरमन रघुनाथ वरूटे आदींनी मनोगत व्यक्त केले. कुंभी कासारी कारखान्याचे माजी संचालक सिताराम पाटील, भगवान दिंडे, शिवाजी चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारूती दिंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.