मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.०७ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के तर मुलांचा निकाल ९३.२९ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
निकालाबाबत जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता आज संपली. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल ९९.५३ टक्के लागला होता. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विभागनिहाय आकडेवारी
कोकण विभाग: ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५