मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने दिलेल्या ऑफरबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी आग्रही असल्याचीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपला दिला.
महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची तुम्ही ही जागा आम्हाला सोडा आम्ही तुम्हाला विधानं परिषदेची एक जास्तीची जागा देऊ असा प्रस्ताव दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आमची चर्चा चांगली झाली आहे. फडणवीस यांचे म्हणणे पक्ष श्रेष्ठींना सांगणार असून दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होईल असेही भुजबळ यांनी म्हटले.