कोल्हापूर : केंद्र सरकारने सर्वच राज्यांना जीएसटीचा परतावा दिला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये मिळाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवायला नवे विषय शोधावे. आणि हो, पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून जनतेला लुबाडणंही बंद करावे!, असा टोला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
केंद्र सरकारने जीएसटी परतावा राज्य सरकारला दिला आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली आहे.केंद्र सरकारने जीएसटी भरपाईची रक्कम राज्यांना दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. जीएसटी भरपाईच्या रकमेवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात होती. आता केंद्राने जीएसटी भरपाईची रक्कम दिल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारला आहे. आता तरी महाविकास आघाडी सरकारने इंधनावरचा कर कमी करावा, जनतेला दिलासा देणार का असा प्रश्न भाजपने विचारला आहे.
केंद्राकडून देशातील २१ राज्यांना जीएसटी परतावा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. केंद्राने एकूण ८६ हजार ९१२ कोटी रुपये दिले असून यात महाराष्ट्राला सर्वाधिक परतावा मिळाला आहे. केंद्राच्या या निर्णय़ानंतर महाविकास आघाडी सरकारकडे भाजपने इंधन दरावरील कर कमी करण्याची मागणी केलीय. उठसूठ केंद्राकडे बोट दाखवणारे ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असा प्रश्न भाजपने विचारला आहे.