केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक : दिलीप वळसे पाटील

मुंबई : केंद्रसरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी जनता दरबार उपक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आजउपस्थित राहिले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.

नोटाबंदीचे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्रसरकारच्या धोरणाचा हा पराभव आहे. हे कशामुळे घडलं व पुढे नियंत्रित करण्यासाठी केंद्रसरकारने काय उपाययोजना केली हे केंद्रसरकारने संपूर्ण चौकशी करून जनतेला माहिती द्यावी अशी मागणीही दिलीप वळसे पाटील यांनी केली.

हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला… हा वाद अनावश्यक आहे याला फार महत्व देऊ नका. महागाई… बेरोजगारी… टंचाई… यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे  यांना आलेल्या धमकीची माहिती गृहविभागाकडे आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. संबंधितांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे वाटल्यास अजून सुरक्षेत वाढ केली जाईल अशी माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.