राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारावरुन काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य सुरू आले आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते, उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातील जागेवर उमेदवारी दिल्याने अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा तसेच आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतापगढी उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे ते निकटवर्ती असून सल्याचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रतापगढी यांच्या उमेदवारीवर जाहीर नाराजी व्यक्त करताना अभिनेत्री नगमा यांनी म्हटले आहे की, “राज्यसभेसाठी मी कमी पात्र आहे का? २००३ साली काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं. १८ वर्षांची तपस्या व्यर्थ ठरली आहे,  अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनीही प्रतापगढी यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली. . देशमुख म्हणाले, “काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून, तर नागपूरचे मुकुल वासनिक यांना राजस्थानातून संधी दिली आहे. वास्तविक मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमेदवारी द्यायला हवी होती. त्यांचा संपर्क नागपूर व विदर्भातील नेत्यांशी व जनतेशी कायम राहील. मात्र, महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. एक कुटुंब एक पद’ अशी काँग्रेसने नुकतीच धोरणात्मक घोषणा केली आहे. असे असतानाही पी. चिदंबरम यांचा मुलगा लोकसभेत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली.