मुंबई : भाजपने सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळाले नाही, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणाले की, भाजपने तपास यंत्रणांना हाताशी धरून अनिल परबांवर सूडबुद्धीने कारवाई केली असून शिवसेना परबांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तसेच सरकारला त्रास देण्यासाठीच राजकीय दृष्टीने कारवाई केली जात असून महाविकास आघाडी सरकारवर दबाव टाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. आमच्याकडेही भाजपच्या असंख्य लोकांविरोधात सबळ पुरावे आहेत. विक्रांत घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो. शौचालय घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल. माझ्यावर मानहानीचा दावा टाकला म्हणून मी माघार घेणार नाही. इतर काही प्रकरणात आम्ही हात घातला आहे. आम्ही ईडीकडे फाईल पाठवली असून ती उघडून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. आम्हीसुद्धा पाहून घेऊ,” असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला आहे.