बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्तारुढ आघाडीने वर्चस्व कायम राखले.
बहिरेश्वर येथे सुरवातीपासूनच कोटेश्वर सेवा संस्था ही एकच संस्था कार्यरत आहे. या सेवा संस्थेवर आजतागायत काॅग्रेस गटाची सत्ता आहे. काही वेळा निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत पण २०२२ ते २०२७ या सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक दुरंगी झाली. यामध्ये राजर्षी शाहू श्री कोटेश्वर विकास सत्तारूढ आघाडी पॅनेलचे नेतृत्व कुंभी माजी संचालक सिताराम पाटील, कुंभीचे माजी व्हा. चेअरमन शामराव गोधडे, जि प सदस्य सुभाष सातपुते, बहिरेश्वरचे माजी सरपंच पी. आर. पाटील माजी सरपंच सुर्यकांत दिंडे, भगवान दिंडे, रघुनाथ वरूटे यांनी केले. तर विरोधी आघाडी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व आनंदा दिंडे, संजय गोधडे,रंगराव कामत यांनी केले .
अपक्ष म्हणून रिंगणात असणारे आनंदा चौगले यांनी सत्तारुढ आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनीही ३४ मते मिळवली. एकुण १२२१ मतदारापैकी ११०८मतदारांनी मतदान केले. एकुण २७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सत्ताधारी गटाने सर्व जागा जिंकत सत्ता अबाधित ठेवली. सर्वसाधारण ४५० चे मताधिक्य घेत विजय संपादित केला. विजयी गटाने गुलालाची उधळण करत जल्लोष केला.