कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेस गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आंब्याच्या जत्रेचा उद्या रविवारी २२ मे शेवटचा दिवस आहे. कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरात कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात श्री शाहू छत्रपती मिलमध्ये शाहू महाराजांच्या विचारावर आधारित विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान आजपासून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ या उपक्रमाला गेल्या तीन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे उद्या रविवार या आंबा जत्रेचा शेवटचा दिवस आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढी पुढे नेण्यासाठी हे कृतज्ञता पर्व आयोजित केले आहे. विविध उपक्रमांबरोबरच विकेल ते पिकेल व या संकल्पनेवर आधारित 'जत्रा आंब्याची' घेण्यात येत आहे. बांधावरुन थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांच्या आंब्याला शाहू मिल येथे थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे याला तीन दिवसात प्रचंड प्रतिसाद हा मिळाला असून माफक दरात उपलब्ध केलेल्या या आंबा जत्रेला कोल्हापूरकर भेट देऊन प्रचंड आंबा खरेदी करत आहेत.
या आंब्याच्या जत्रेत विविध प्रजातीचा आंबा म्हणजेच देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या यांसह केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दुधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम आदी सह वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे या जत्रेत उपलब्ध आहेत.यातील सर्वच आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री ही झाली असून पहिल्या दिवशी तब्बल ६ मेट्रिक टन आंबा विक्री व उलाढाल ही सव्वासहा लाख रुपये इतकी झाली आहे.तर दुसऱ्या दिवशी साडेचार मेट्रिक टन विक्री तर ४ लाख ८० हजार उलाढाल ही झाली होती तर आज तिसऱ्या दिवशी साडेअकरा टन मेट्रिक टन आंबा विक्री ११ लाख ४० हजार आंब्याची उलाढाल ही झाली आहे.
आंब्यांच्या जत्रेत १८ हून अधिक प्रजातींचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून तिसऱ्या दिवसाअखेर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. याठिकाणी १८ उत्पादकांचे १८ स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये तिसऱ्या दिवसाअखेर तब्बल २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली असून यातून सुमारे २२.५० लाखांहून अधिक रक्कमेची उलाढाल झाली असल्याची माहिती उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी दिली.या तीन दिवसात हापूस,केशर व पायरी या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.