कोल्हापूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सध्या दंडेलशाही पध्दतीने काम करीत आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुण्यामध्ये असताना एका कार्यक्रमात पोलिसांच्या समोर सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते आंदोलन करतात.पण पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेतात. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हात पाय तोडण्याचे वक्तव्य करीत असतील तर हे वक्तव्य कोणत्या अधिकारात व कायद्यात बसते. त्यांच्याविरोधात कारवाई कधी होणार असा थेट सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज कोल्हापूर येथे केला.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सांगितले की, भाजपचे नेते किरिट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ले होत आहेत. महिलांवरही हात उचलण्याचे काम होत आहे. केतकी चितळेच्या सोशल मिडियाच्या पोस्टचे कोणीही समर्थन करणार नाही, आम्हीही त्या पोस्टचा निषेध केला. परंतु चितळे यांच्यावर पोलिसांसमोर अंडी फेकण्याचा प्रकार झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यामधील एका कार्यक्रमात पोलिसांच्या समोर सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते आंदोलन करतात. पोलिसांना याची कल्पना देण्यात आली असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. कारण पोलिस सध्या सरकारच्या दबावाखाली काम करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अश्या प्रकारे सरकार पुरस्कृत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची दहशत सुरु आहे. एखाद्याने प्रक्षोभक विधान केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा व त्यांना अटक करायची, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हात पाय तोडण्याचे वक्तव्य करीत असतील तर हे वक्तव्य कोणत्या अधिकारात व कायद्यात बसते असा सवालही दरेकर यांनी केला.
फडणवीस यांच्या प्रत्युत्तरानंतर बडबड बंद
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बीकेसी येथील टोमणे सभेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील सभेत दमदार प्रत्युत्तर देत त्यांच्या वक्तव्यांचा पर्दाफाश केला. उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा तपशिलासह समाचार घेतला. त्यामुळे नेहमी बडबड करणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची तोंड बंद झालेली दिसत आहेत असा टोलाही दरेकर यांनी मारला.
हनुमान चालिसाचे वाचन करण्याचा विषय आला की राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, पण औरंगजेबच्या कबरीवर फुले टाकणे व दर्शन घेणे हा राजशिष्टाचार आहे का असा सवालही दरेकर यांनी केला.
हा तर सत्तेचा मग्रुरपणा
हसन मुश्रीफ राज्याचे कामगार मंत्री आहेत,बांधकाम कामगारांच्या संदर्भात त्यांचे वक्तव्य मी पाहिले व एकले. त्यांनी जे बांधकाम कामगारांच्याबाबत जे वक्तव्य केले आहेत ते नक्कीच निषेधार्ह आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे मग्रुरपणाचे आहे. केवळ सत्ता आमच्याकडे आहे, त्या सत्तेचा हा माज आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या भ्रष्ट कारभाराचा विषय कुठेही मागे पडलेला नाही. त्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आमची कायम आहे. हा विषय आम्ही निश्चितपणे टोकापर्यंत नेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
छत्रपति संभाजी राजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेवारीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना पाठींब्याची भूमिका घेतली. तर शिवसेनेने दुसरीकडे आपण दुसरा उमेदवार देऊ असे स्पष्ट केले आहे. तर कॉंग्रसेने अद्यापही या विषयावर त्यांची भूमिका उघड केली नाही. त्यामुळे आधी महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी सल्ले देऊ नयेत
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व रोहित पवार यांच्यात ट्विटर वार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, रोहित पवार हे अजून लहान असून चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया द्यायला मोठे पवार आणि दोन नंबरचे पवार अजून आहेत. यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सल्ला देऊ नये. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार हे आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण बुजुर्ग असल्याचा प्रयत्न करत असल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेस भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, सत्यजित उर्फ नाना कदम, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.