कोल्हापूर : राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षण हे मूलभूत आहे, गुणवत्ता हे आपले सामान्य वैशिष्य असून यासाठी दृष्टिकोन, सराव, छंद आणि अभिमान हे चार घटक महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन नॅकचे माजी संचालक प्रा. व्ही. एस प्रसाद यांनी केले.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीबाबतच्या विविध उपाययोजनाबाबत एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.
डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीबाबतच्या विविध उपाययोजनाबाबत उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन (इमर्जिंग क्वालिटी पर्स्पेक्टिव्ह इन हायर एज्युकेशन ) एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या परिसंवादाचे उदघाटन ‘नॅक’ चे माजी संचालक प्रा. व्ही. एस.प्रसाद यांच्या हस्ते व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी बदलत्या शिक्षण पद्धती आणि शैक्षणिक परिसंस्था या विषयावर मार्गदर्शन केले. श्री बालाजी विद्यापीठ पोंडेचेरीचे कुलगुरू प्रा. सुभाष पारिजा हे या परिसंवादात ऑनलाईन सहभागी झाले होते.
परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात के. एल. इ. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी गुणवत्ता निर्देशांकासह अध्यापनशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी अभ्यासक्रम विकसनाद्वारे गुणवत्ता आणि प्र- कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले.
या परिसंवादासाठी डी. वाय. पाटील संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. सीडी लोखंडे, प्राध्यापक सुचित्राराणी राठोड, डॉ. जाविद सागर, रूधीर बारदेस्कर, डॉ. आर एस पाटील, डॉ. बी पी साबळे, डॉ.विलास साळोखे, डॉ. प्रथापन प्रा. जे एफ पाटील, आदी सह शैक्षणिक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आभार डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. निवेदिता पाटील आणि डॉ. अर्पिता तिवारी यांनी केले.