मुंबई : ‘पंतप्रधानांना देशातील महागाईपेक्षा युक्रेन युद्धाची चिंता लागली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
“महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. पंतप्रधानांना रशिया-युक्रेन युद्धाची सर्वाधिक काळजी आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्त करताहेत आणि त्यांचे भक्त त्यासंदर्भात हवा करत आहेत. पण या देशातली जनता महागाईशी युद्ध करतेय.”, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
संजय राऊत म्हणाले, “पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, बेरोजगारी त्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचा एकतरी नेता अथवा मंत्री बोलतोय का? भोंग्यावर कसले बोलताय, सरकार म्हणुन तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा याच्यावर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही.”
“महाराष्ट्रात काही लोकांनी लाउडस्पिकरच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव आणि दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार, या राज्यात काम सुरू आहे आणि नक्कीच राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय ते बरोबर आहे. आम्हीही तेच म्हणतोय की, या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण तुम्ही जाहीर करा, धोरण तयार करा आणि संपुर्ण देशात लागू करा.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.