पवारांच्या बालेकिल्यात राजू शेट्टींच्या बळीराजाचा ‘हुंकार’ !

इंदापूर ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात काम करणारे तीन पक्षाचे सरकार असो वा केंद्रातील भाजप सरकार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांना अडकवणे, वस्त्रहरण करणे यातच यांना रस आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे कुणाचेच ध्यान नाही. म्हणून जे बारामतीकर दिवसाची व भाषणाची सुरवात करताना यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन करतात त्या यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करून बळीराजा हुंकार यात्रा शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी काढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भवानीनगर (ता. इंदापूर) येथील बळीराजा हुंकार मेळाव्यात बोलताना सांगितले.

ऊस हे आळशी पीक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. ज्यांच्या जीवावर पवार मोठे झाले, त्यांनाच आळशी ठरविण्यासाठी अशी बांडगुळासारखी वक्तव्ये करायची हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.उसासाठी १८ महिने राबावे लागते. त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. औषध खते, मशागत यांची गरज लागते. यानंतर पुन्हा कारखानदाराच्या मागे लागायचे. ऊस तोड आणायची आणि मग बिलासाठी ओढाताण करायची. एवढ्या सगळ्या प्रक्रियेत आळस टिकतच नाही. मग शरद पवारांना हे पीक आळशी कसे वाटते.

महावितरणने शासनावर अवलंबून न राहता वार्षिक किती कोळसा लागतो, याचे नियोजन करून परदेशातून कोळसा आयात करणे आवश्यक होते. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणीही गृहीत धरू नये. कारण संघटनेचे उद्दिष्ट हे राजकारण करणे किंवा राजकारणातून सत्ता स्थापन करणे नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आहे. जो कोणी शेतकऱ्यांला फसवेल त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही . सध्या राज्यांमध्ये राजकीय कुरघोड्या सुरू आहेत, हनुमान चालीसा, भोंगे असे प्रश्न उपस्थित करून विकासाच्या मुद्द्यांना बाजूला केले जात असून राज्यातील जनता या गोष्टीला विटलेली आहे. यासाठीच मी बळीराजा हंकार यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.


यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक , शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश भैय्या काकडे , युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमर कदम , बारामती तालुका अध्यक्ष विलास सस्ते , राजेंद्र ढवाण पाटील , महेंद्र तावरे , यांचेसह परिसरातील विविध संस्था व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

🤙 9921334545