कोल्हापूर : विजेची मागणी वाढली याचा अर्थ टंचाई आहे अशातला भाग नाही. खाजगी क्षेत्रात मुबलक वीज असून मागणी लक्षात घेऊन खरेदीचे करार झाले असते तर ही वेळ आली नसती. पण यांना खुल्या बाजारात वीस-बावीस रुपयांनी वीज खरेदी करून पैसा खायचा आहे. केवळ भ्रष्टाचार आणि पैशांच्या लालसेसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विजेसाठी वणवण फिरावे लागत आहे, त्यांची पिके वाळत आहेत. याची जबाबदारी ऊर्जा खाते, महावितरण महापारेषण व महाजनकोची आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
शेट्टी म्हणाले, राज्यात उन्हाचा कडाका जसजसा वाढत चालला आहे, तशी विजेची मागणी वाढत आहे. वास्तविक पाहता हे संकट काही नवीन नाही. हवामान खात्याने आधीच सांगितलं होतं, उन्हाळा कडक जाणार आहे. ज्यावेळी उन्हाळा कडक असतो, त्यावेळी विजेची मागणीही वाढलेली असते. शेतकऱ्याकडून तसेच घरगुती कारणासाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याचे नियोजन करण्याची महावितरणवर मोठी जबाबदारी होती. पण कुठेतरी महावितरण व महाजनको यांच्यात समन्वयाचा अभाव राहिला. एकूणच ऊर्जा खात्याचे हे अपयश आहे. त्यांनी नियोजन केले नाही म्हणूनच आज टंचाई भासते आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून आठ तास वीज मिळायची ती आता तीन-साडेतीन तास मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिकं वाळू लागली आहेत. केवळ शेतकऱ्यांवरच भारनियमन लावले जाते हे चुकीच आहे, हे जर थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.