कागल (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजे फाउंडेशनच्या वतीने कागल येथे २२ ते २५ एप्रिल या दरम्यान राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घाटगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमधील शेती सुजलाम-सुफलाम व्हावी. यासाठी सिंचन व्यवस्थेसह येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. यासाठी गावोगावी यात्रा जत्रांच्या निमित्ताने पशुपक्षी गुरे व कृषी साहित्यांची प्रदर्शने भरवली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यांचाच कित्ता गिरवत शाहू साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखाना व विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून भागाचा किती चांगल्या पद्धतीने कायापालट करून दाखवता येतो, याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. शेतकरी हिताची व विकासाची हीच परंपरा पुढे चालवत कोल्हापूर संस्थानाचे लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त या राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या कृषी प्रदर्शनात प्रामुख्याने शेतीतील बदलणारे तंत्रज्ञान बियाणांच्या विविध जाती, आधुनिक अवजारे, सेंद्रिय तसेच परंपरागत शेती पद्धती, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची खते, सिंचन, तसेच शेतीपूरक उत्पादनांची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यांना मिळणार आहे. १५० हून अधिक स्टाँल्स, कृषी तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने,, प्रात्यक्षिके, स्लाईड शोज अशा अनेक उपयुक्त गोष्टी या दरम्यान आयोजित केल्या आहेत. या प्रदर्शनात महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल राखीव ठेवण्यात आले आहेत.
श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या आवारात हे कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर या प्रदर्शनात शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल असा विश्वासही घाटगे यांनी व्यक्त केला.