गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभाग व दुर्ग शिलेदार, भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘माझी चिऊताई’ अभियान कार्यशाळा झाली. यावेळी वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूरचे अध्यक्ष अभिजित वाघमोडे यांनी चिमण्यांसाठी घरटे तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून २०० विद्यार्थ्यांकडून घरटी तयार करून घेतली.
वर्ल्ड फॉर नेचरचे अध्यक्ष, तिलारी जलविद्युत केंद्राचे अभियंता अभिजित वाघमोडे म्हणाले, चिमणी हा माणसाच्या जवळचा पक्षी असून पृथ्वीवरुन चिमणी नष्ट झाली तर निसर्गचक्र मंदावेल. अलीकडच्या काळात वाढत असलेले शहरी जीवन, मोबाईल टॉवर, कचरा यामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली असून मातीची घरे कमी झाल्याने चिमण्यांना घरटी करायला जागाच उरलेली नाही. यामुळे चिमणीच्या घरट्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यासाठीच चिमणीचे घरटे तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी टाकावू वस्तूपासून घरटी कशाप्रकारे तयार करायची याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष घरटी तयार करुन घेतली.
प्रसिद्ध जंगल अभ्यासक, अरण्यवाचक दत्ता मोरसे सर यांनी प्राणी व पशुपक्ष्यांच्या संवर्धनासाठी उपयुक्त माहिती दिली. जंगलातील लागलेल्या वणव्यामुळे निसर्गाची हानी कशी होते व त्याचे दुष्परिणाम याची माहिती दिली.
गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी चिमण्यांचा अधिवास जपण्यासाठी तसेच या कडक उन्हात मुक्या पशु-पक्ष्यांसाठी आपल्या घराजवळ, आजूबाजूच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करा, असे आवाहन केले तसेच विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या, ज्या घरट्यात चिमण्या राहायला येतील, त्या विद्यार्थ्यांना ‘संवेदना प्रतिष्ठान’तर्फे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी घोषणा केली.
यावेळी उपशिक्षणाधिकारी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बिद्रीचे संचालक मधुआप्पा देसाई, लेखक अमर मुसळे, केंद्रप्रमुख संजय कुकडे, नीलेश मुंगारे, सुशांत वाघमोडे, नारायण कुंभार, सुशांत गुरव, शरद खोत, दुर्ग शिलेदार साताप्पा गुरव, आनंद देसाई, दत्ता गवसे, संग्राम देसाई, दिगंबर जाधव यांच्यासह परिसरातील शाळांचे सुमारे २०० विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी आभार मानले, तर मनोज देसाई यांनी सूत्रसंचालन केले.