कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक

कोल्हापूर : वैद्यकीय परवाना तसेच शैक्षणिक अर्हता नसतानाही बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. कोल्हापूर येथील रंकाळा परिसरातील हरिओमनगर, अंबाई टँक तसेच पडळ (ता. पन्हाळा) येथील रुग्णालयावर छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक संशयित पसार झाला आहे. ही कारवाई आज, गुरुवारी पहाटे  करण्यात आली. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६, रा. करंजफेण, ता. शाहूवाडी, सध्या राहणार हरिओमनगर, अंबाई टँक, रंकाळा परिसर, कोल्हापूर) व हर्षल रवींद्र नाईक (वय ४० रा. प्रतिराज गार्डन, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) या दोन बोगस डॉक्टरांचा तसेच एजंट भरत पोवार (कोल्हापूर), दत्तात्रय महादेव शिंदे (वय ४२ रा. पडळ, ता. पन्हाळा) या चौघांवर स्त्रीभ्रूण हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यापैकी उमेश पोवार, हर्षल नाईक, दत्तात्रय शिंदे यांना अटक झाली असून भरत पोवार हा एजंट पसार झाला आहे.

दरम्यान, बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने विशेष पथकाने संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या रॅकेटचा शहर आणि जिल्ह्यात किती काळ हा प्रकार सुरू होता आणि आजवर या रॅकेटने किती गर्भपात केले आहेत, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

🤙 9921334545