करुणा मुंडे यांचाही खळबळजनक आरोप !

कोल्हापूर : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सभेदरम्यान दगडफेक झाल्याचा आरोप केला होता. तर आता करुणा मुंडे- शर्मा यांनीही अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणांगणात शिवशक्ती सेनेतर्फे करुणा शर्मा- मुंडे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान करुणा शर्मा- मुंडे यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.  बिंदू चौकात प्रचारासाठी गेल असता त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीत येऊन बसली. कार्यकर्त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर त्याने कार्यकर्त्यांला गाडीतच मारहाण केल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. याशिवाय कोल्हापूरमध्ये प्रचार करत असताना ही अज्ञात व्यक्ती वारंवार माझा पाठलाग करत आहे. मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी ही व्यक्ती असते,  असा आरोपही त्यांनी केला आहे.

‘राज्यात महिला सुरक्षित नाही, ही गुंडागर्दी कधी थांबणार आहे, यासाठीच मी उत्तर कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवत आहे. पण, त्यामुळे माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी मी अर्ज केला होता. राज्यपालांकडेही अर्ज केला होता होता. त्यांनी तो अर्ज गृहखात्याकडे दिला आहे, पण राज्यपालांनी सांगूनही सरकारकडून मला सुरक्षा मिळत नाही.