कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पूरग्रस्त शेतकर्यांना अद्याप पूर्ण नुकसान भरपाई मिळालेली नाही. या सरकारने केवळ भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचा कळस गाठलाय, अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची तोफ डागली.
कोल्हापूर उत्तर मतदार संघातील भाजप उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारार्थ, तटाकडील तालीम येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी खोत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षातील कारभाराचा पंचनामा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकार पाच वर्षं सत्तेवर असताना, शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय झाले. आता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात, जनतेला वार्यावर सोडले आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे आघाडी सरकारमधील मंत्री जेलमध्ये जात असून, त्यांची पाठराखण करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. पूरग्रस्त शेतकर्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न गंभीर बनले आहेत. कोरोना कालावधीत केंद्र सरकारने महाविकास आघाडी सरकारला प्रचंड मदत दिली. मात्र महाविकास आघाडी सरकारने कोरोना कालावधीतही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करण्याची संधी सोडली नाही, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली. भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी, कोल्हापूर उत्तरपासून सुरूवात करा आणि सत्यजितनाना कदम यांना विजयी करा, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले.
यावेळी प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी निर्माण केलेल्या दहशतीवर सडकून टीका केली.
महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी राजू जाधव, दयावान ग्रुपचे अध्यक्ष प्रताप देसाई, हिंदवी ग्रुपचे सुदर्शन सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, महेश उरसाल, गायत्री राऊत उपस्थित होत्या.
