मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद करण्याबाबत कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारच्या बैठकीत मतैक्य झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर बुधवारी घोषणा केली जाईल. त्यामुळे सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
करोना रुग्ण वाढल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना प्रसारानुसार, अन्य शहरांमधील शाळाही टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. महाविद्यालयेही बंद करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालये बंद करावी व ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यावर सर्वाचे एकमत झाले. बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केले.